Friday, March 28, 2008

खो-खो, चिमणी, मंत्रा!!

Get this widget | Track details | eSnips Social DNA

अगं पकड... पळ पळ.. हट, खो दे.. इथे खो दे..."


"डावीकडे जा.. धर तिला... मुर्खा हात पसरता येत नाहीत का?... खो दे पटकन"


"लगेच वळायचं नाही... आधी सरळ रेषेत पळायचं मग भिडु कोणत्या दिशेला जातोय बघायचं मग आपली दिशा ठरावायची"


पीटी सर सांगत होते, आम्ही बघत होतो... खो-खो... सोप्पा नाहीये राव!! माझ्यापेक्षा सगळे मोठे, माझ्यापेक्षा जास्त अनुभवी, काही मुली इंटरनॅशनल लेवलवर खेळतील इतक्या भारी.... मग आम्ही ५-६वीतल्या चिल्ल्या-पिल्ल्या तिथे काय करत होतो? त्या सगळ्या तायांमधें आम्ही लिंबु-टिंबु... आम्हाला त्यांच्यासारखं पळता कुठं येणारे? त्याच्या ट्रिक्स कुठे माहित्येत?

सर म्हणाले.. "भिडु नाही पकडला गेला तरी चालेल.. पण खेळा, धडपडा, पळा...त्यातुनचं शिकाल!"

मेघना, संवेद, ट्युलिप, राज, निमिष, केतन, विद्या.... पटापट भिडु पकडणारी लोकं, त्यांचा खेळ बघत बसावा इतका सुंदर... खो द्यायची पद्धत अप्रतिम! आपल्याला ह्याची ट्रिक कळली बुवा म्हणुन आपण त्यांना पकडायला जाउ.. पण हि लोक कधीच नाही सापडायची!! मग मी लिंबु-टिंबु काय करत्ये इथे?मी इथे का आहे...का लिहित्ये?

नाही लिहायला जमलं, नाही सापडली उत्तरं-नाही पकडता येत हो नेहेमी भिडु...

पण लिहित्ये.. लिहायचा प्रयत्न करत्ये... चुकत्ये...आणि त्यातुनचं शिकत्ये!!!

yeah i guess इतक्या सिंपली मी हे म्हणु शकत्ये... मी इथे हा खेळ, ही कला म्हणा शिकायला आहे... अनेक फालतु.. अनेक फिलॊसोफिकल, अनेक emotional प्रश्नांची उत्तरं सापडवत्ये... लिहिल्यामुळे जराशी organize होतायंत उत्तरं इतकचं!! so म्हणुन लिहित्ये...

..........................................................................................

काही दिवसांपुर्वी लहान मुलं आणि लिहिणं ह्याबाबतीत काहीतरी वाचत होते. एका बाईनी तिचा एक अनुभव लिहिला होता... ती तिच्या कामात होती, अचानक तिची मुलगी तिथे आली , घराबाहेर एक लहान चिमणी पडल्ये आणि तिला मुंग्या त्रास देताय्त हे आईला सांगायला लागली... आईला मुळ्ळीच वेळ नव्हता.. आईनी तरी एकदा बाहेर येउन चिमणी पाहिली.. मुलीला सांगितलं... "बाळ, ती चिमणी आता देवाघरी गेल्ये... तु आत येउन खेळ" आई परत आपल्या कामात बुडाली... मुलीने तिच्या एका मैत्रिणीला बोलावुन आणलं आणि दोघींची काहीतरी खुडबुड सुरु झाली.. घरातुन बाहेर.. बाहेरुन आत सतत काहीतरी चालू होतं... आईनी खिडकीतुन बाहेर ह्या मुलींकडे पाहिल्यावर त्या झाडाखाली काहीतरी करताना दिसल्या, आई तिथे गेली... तिथे एक खड्डा खणुन तो परत बुजवल्याच्या खुणा होत्या, त्याच्या आजुबाजुला पांढरे दगड ठेवले होते... काड्यांचा एक क्रॉस त्या खड्यावर लावला होता आणि त्यावर एक कागद लावला होता ज्यावर लिहिलं होतं "we had to let everyone know, how we felt"

एक छोटासा पक्षी.. कधीतरी जिवन्त असणारा, आता या जगात नाही... कदाचित आपल्या मोठ्यांसाठी इतकी महत्वाची गोष्ट नसेल ही.. पण त्या पिल्लांसाठी नक्कीच होती... आणि त्यांनी ती लिहुन व्यक्त केली... लिहायचं मन मोकळं करण्यासाठी... स्वतःला express करण्यासाठी!!

.......................................

काल रात्री ह्याबाबतीत भरपुर विचार करत होते... नेहेमी सारखी उत्तरं तर सापडत नव्हतीच... अचानक आयपॉड वर युफोरियाचं हे गाणं सुरु झालं.... यार हेच तर उत्तर आहे!! का लिहित्ये ह्याचं... हे सगळे प्रश्न मलाही तर रोज पडताय्त! blogging is just an attempt of ascertaining My Mantra....

माझा ’खो’ संवादिनीला

Thursday, March 20, 2008

ये तारा, वोह तारा...

आज तुळशीबागेत फिरत असताना, अचानक एक मुलगा हातात काही पाकिटं घेउन समोर आला... त्यावर ता-यांची चित्रं होती. मी त्या गर्दीत थांबुन त्याकडे पाहिलं... "तारांगण"... घरात वरच्या सिलिंगवर चिकटवायचे तारे, जे काळोखात चमकतात... छोटे तारे, मोठे तारे,चंद्रकोर, शनी, रॉकेट, धुमकेतु असे काही स्टिकर्स होते त्यात...

ते बघुन मला मी ३री-४थीत असतानाचे आमचे रेडियम-स्टार आठवले... आमची सगळी ट्रान्सॅक्शन्स त्या ता-यांनी व्हायची..."ए माझं नाव बाईंना नको सांगु, मी तुला एक रेडियम देईन"
"मला खोडरबर दिलास तरचं मी तुला स्टार देइन"
"त्याच्या नावाच्या बॅचमधे त्यानी ४ स्टार लावल्येत... त्याच्याशी नकॊ बोलुया.. तो कोणाला ते देत नाही"
आता रेडियम असण्याचा आणि लंगडी येण्याचा काय संबंध? पण मला आठवतं, ज्या मुलाकडे जास्त स्टार होते त्याला आपल्या गटात घ्यायला भांडणं व्हायची!
पुढे शाळेतुनच ज्या मुलांनी प्रत्येक महिन्यात सगळा गृहपाठ पुर्ण केलाय त्यांना हे रेडियम स्टार नावाच्या बॅचमधे लावायला मिळायचे... मला ह्या चांदण्या कधीच मिळाल्या नाहीत! तसा माझा आणि गृहपाठाचा काही संबंधच नसायचा म्हणा!

नंतर एकदा सुट्टीत पुण्याला आले असताना तुळशीबागेतुनच बाबांकडे भरपुर हट्ट करुन भरपुर रेडियम विकत घेतले होते! मी आणि दिपिका मग रोज खोलीचा दिवा बंद करुन काळोख करुन पांघरुणाखाली हे रेडियम स्टार बघायचो! काय मज्जा होती राव... त्या इवल्याश्या रेडियमच्या हिरवट चांदण्या कित्ती कित्ती आनंद देउन जात होत्या! मग जस जशी मोठी झाले..त्या चांदण्या कुठे गेल्या कळलंच नाही! आकाशातल्या ख-याखु-या चांदण्या आवडायल्या लागल्या
अलिबागचं आकाश सुंदरचं होतं... संपुर्ण ता-यांनी भरलेलं.. पुण्या-मुंबईच्या लोकांना ती मज्जा नाही कळायची! आमच्या इथल्या हौशी आकाश-निरिक्षकांबरोबर मी सुद्धा आमच्या मोठ्ठ्या मैदानात जाउन ग्रह-तारे बघायला लागले...
"तो बघ तो ..., पृथ्वीपासुन ....कोटी लांब आहे... आणि त्यांच्या बाजुचा तो पिवळसर तारा ...हजार प्रकाशवर्ष दुर आहे" ..."ह्याचा आकार एवढा आहे", "हे नक्षत्र, तो तारकासमुह", "हा धुमकेतु...साली दिसला", "ह्याच्या वरचा डाग, त्याचावरची खळगी", "ह्याचं आयुष्य... त्याचा स्फोट", "नवा तारा.. आपली आकाशगंगा..." "ता-यांचा मार्ग", "दिशा..एक वीत खाली ध्रुव तारा, वर तिथे सप्तर्षी... तो मृग, तो व्याध", "पिधानयुती, ग्रहण","उल्कापात".... रोज नवीन नवीन गोष्टी तिथले काका सांगत होते...

आणि मी वरती आकाशाकडे बघत त्यांना विचारत होते... "काका, माणुस मेल्यावर त्यांचं काय होतं हो?" कारण आता ’माणुस मेल्यावर त्यांचा आकाशात तारा होतो,’ ह्यावरचा विश्वास त्यांनीच मोडीत काढला होता!
"ध्रुव तारा काही हजार वर्षांनी बदलणार आहे, त्याचं ठिकाण ही नक्की नाहीये.. त्याच्या खाली असणारा अभिजीत तारा काही वर्षांनी आपला ध्रुव तारा बनणार".. काका सांगत होते! विष्णूनी ध्रुव बाळाला फसवलं? त्याला अढळ स्थान, कधीही न बदलणारं स्थान दिलंच नाही?
मी आता आकाशदर्शनाच्या कार्यक्रमाला जाणं बंद केलं, मला माझे बावळट असले तरी विश्वास तोडायचे नव्हते... मला अजुनही माझ्या आजी-आजोबांचे तारे एकत्र फिरताना दिसतात.. आणि काका म्हणायचे ते तारे प्रत्यक्षात एकमेकांपासुन काही प्रकाशवर्ष दुर आहेत! ह्यॅ... कशालाच काहीच अर्थ नाही!!

हिमालयात गेले असताना, तिथलं आकाश माझ्या अलिबागच्या आकाशापेक्षा श्रीमंत दिसलं...सगळं काही अनोळखी, नवीन असताना.. मला माझा व्याध, ध्रुव आपले जवळचे वाटत होते! अलिबागच्या घरातल्या खिडकीतुन कित्ती रात्री त्या चांदण्याशी बोलण्यात घालवल्या! पुण्यात खिडकीतुन फक्त दिसतात बाकीच्या घरांचे दिवे!..दुरवर ता-यांसारख्या खिडक्या आणि त्यातले दिवे पसरलेले!

म्हणुन मग आज त्या मुलाकडुन ते रेडियम-स्टार विकत घेतले.. घरी आल्या आल्या स्टुल, बेड, बेड्वर स्टुल असे अनेक प्रकार करुन त्या हिरवट चांदण्या आमच्या खोलीत चिकटवल्या.. त्यात सप्तर्षी बनवली, मृग, कृतिका, उत्तरा, शर्मिष्ठा माझ्या खोलीत आल्या! ... रात्री झोपेन तेन्व्हा माझ्याकडे माझे ते सगळे तारे हसुन बघत असतील!

रेडियम स्टार- अलिबागचं आकाश आणि माझ्या चांदण्या , एक चक्र पुर्ण झालं!!

Saturday, March 8, 2008

"तु तो मेरा बेटा है!"

sourabh आणि स्नेहा ह्यांचा "नाही चिरा... नाही पणती" वाचल्यावर मलाही माझे काही अनुभव आठवले. १९९९ची गोष्ट. एप्रिल-मे मधे मी आणि बाबा हिमालयात ट्रेकला जाणार होतो.

youth hostel कडुन आम्ही चंद्रखाणी पास ह्या कुलु-मनाली जवळच्या रुटवर जात होतो. मी तेन्व्हा ८वीत गेले होते. YHA च्या ट्रेकला येणारी बाकी सगळीचं माणसं माझ्याहुन वयाने बरीच मोठी होती. माझ्या वयाचा फक्त १ मुलगा होता, पण आमच्यात फक्त स्पर्धाचं होती... कोण आधी पुढे जातं ह्याची! आणि १-२ अपवाद सोडता आश्चर्यकारकरित्या मी पहिली पोचत होते! आणि माझा चालविता धनी होता "त्यागी चच्चा"



कुलूहुन आम्ही बेस कॅम्पसाठी बस घेतली तेंव्हा मी खुप खुप आनंदात होते, एकतर हिमालयाशी झालेली पहिलीच भेट होती. लांबवर बर्फाळलेली शिखरं दिसत होती. थंडगार हवा, पार्वतीचं खळाळतं पाणी.... स्वर्ग!!

कॅम्पवर पोचल्यावर तिथे तंबू बघुन मस्तचं वाटलं... एकदम adventure वगैरे करणारोत असं काही तरी...

तिथे गेल्या गेल्या तिथल्या instructorsनी सांगितलं... हा पुरुषांचा तंबु आणि हा बायकांचा! म्हणजे बाबा आणि मी वेगळे... दुसरी अट , आता इथे फक्त इंग्लिश किन्वा हिंदी बोलायचं, मराठी चालणार नाही!

माझा थोडा थोडा आत्मविश्वास कमी होयला लागला होता! आता काय होणारे, कोणास ठाउक?

इतक्यात आमच्याच ट्रेक टिम मधे असणारा एक ग्रुप तिथे आला... साधारण ८-१० हट्टे-कट्टे लोक त्यांच्या एका म्हातार्या लिडर बरोबर आले. त्यातल्या एकाने आमच्याकडे पाहिलं आणि विचारलं? "C-६? चलिये, आपका स्वागत है! हम मेरट कॅम्पके लोग है! मै खान, हम सब आर्मी के लोग है!"

एकाने माझ्याकडुन विचारलं "ये बच्ची चढ पायेगी?"

मला अस्सा राग आला होता, तुम्ही असाल आर्मीत म्हणुन काय झालं? मला का under-estimate करताय? तेवढ्यात त्यांच्यातलेच एक चाचा म्हणाले "अरे भाई क्यु नही चढेगी? हम सब से आगे भागेगी!" मला ते चाचा आवडले! म्हणजे माझ्यावर विश्वास दाखवला म्हणुनही आणि एकुणचं ते एकदम सही वाटले.

आमच्या ट्रेकला सुरुवात झाली. पहिला दिवस, मी sollidd टरकले होते, कारण practice trekला सगळी हवा निघाली होती. हळु हळु चालायला सुरुवात केली... एक एक माणुस overtake करायला लागल्यावर लक्षात आलं, आता मागे एकच group राहिलाय, जर तो ही माझ्यापुढे गेला, तर माझं खरं नाही! अचानक एका वळणानंतर "फौजी group" थांबलेला दिसला... मी म्हंटलं, चला आता ह्याचे taunts ऐका... तेवढ्यात मला बघुन त्यातले एक ’पांजा चच्चा’ म्हणाले... "अरे त्यागी, देख मेमसाब यहापे है!" ...
मला काहिच कळलं नाही, मी त्यांच्याइकडे न थांबता पुढेच चालत राहिले!
त्यातल्या त्यात आता आपल्या मागे अजुन काही जणं वाढली ह्याचं समाधान... थोड्या वेळाने, त्यागी चच्चा मागुन आले... "अरे बेटा तुम्हारे लियेही मै रुका था, चलो सबसे पहले पहुचना है ना?"... मला महित होतं ते काही शक्य नाहिये, म्हणुन मी फक्त त्यांच्याकडे बघुन हसले... काहिही न बोलता त्यानी हळुहळु चालण्याचा वेग वाढवला, मीसुद्धा त्यांचा वेग संसर्गजन्य असल्याप्रमाणे fast चालयला लागले. मगाशी मला overtake करणारी माणसं मागे पडायला लागली... आणि आम्ही आणि आमच्या पाठॊपाठ सगळा फौजी ग्रुप आला.. आम्ही आमच्या वाटाड्यापर्यन्त पोचलो होतो! बाबा co-leader असल्याने सर्वात शेवटी होते... आणि मी सर्वात पहिली! आमच्या दोघांमधे साधारण १ तासचं अंतर असावं... पण आता आधीच्या दोन दिवसातली भीती पळाली होती.. त्यागी चच्चा, खान्चा दोघांशी गप्पा मारत मी चढत होते!
अचानक एके ठिकाणी पाउसाला सुरुवात झाली, माझ्याकडे ओझं नको म्हणुन माझा raincoat मी बाबांना दिला होता..कारण मला महित होतं मी सर्वात शेवटी असणारे, त्यागी चच्चांनी लगेच त्यांची बरसाती दिली. मी त्यांना म्हंट्लं "आप रखलो" .. "तु तो मेरा बेटा है रे.. पेहेन जल्दी"
पावसाचा जोर वाढायला लागला.. आम्ही सगळे थांबलो... ते ८-१० फौजी आणि मी एक लहान मुलगी... खान्चाचा नी वर पाहिलं, एका बाजुला दरी आणि एका बाजुला डोंगर अश्या ठिकाणी आम्ही उभे होतो...त्यांनी वाटाड्याशी काहीतरी डिसकस केलं आणि म्हणाले
"Highway ले क्या?" हायवे? ते काय असतं? त्यागी चच्चा म्हणाले.. "अपने साथ बेटी है"...
"अरे शेरनी है, चढेगी" असं कॊणितरी म्हणालं... मला काही कळेना... त्यागी चच्चानी माझा हात धरला.. आणि जोरात ओरडले "जोरसे बोलो...." बाकी सगळे ओरडले "जय माता दी"... मी अजुनही blank...पण आता इथे काहीतरी वेगळं होणारे हे कळलं... एक वळण पार केल्यावर खान्चचा नी समोर बोट केलं.. यहासे चढेंगे... समोर एक खडा चढ, आणि पावसाने निसरडा झालेला...समोरची छान वाट सोडुन हे असं चढायचं?
वाटाड्या आणि पांजा चच्चा पुढे हौन पटापट वाट बनवायला लागले, वाटेत येणारी झुडुपं बाजुला सारयला लागले.
"मै नही यहासे..." म्हणेपर्यन्त त्यागी चच्चानी मला "चलॊ जवान, आगे बढो" म्हंट्लं...
"जोर से बोलो.. जय मात दी"
"अरे साथ्मे बोलो...जय माता दी"
"पैर नही थकते.. जय माता दी"
"बोलो बोलो ... जय माता दी"
माता माता की जय.. दुर्गा मात की जय.. अश्या अनेक घोषणा ते देत होते.. मी थकले होते, घाबरले होते.. पण त्या चढावरुन पटापट चढत होते.. त्यागी चच्चा "शब्बास बेटा" म्हणून माझ्या पाठोपाठ... हळु हळु त्याचा उत्साह माझ्यातही आला.. एका "जोर से बोलो..." ला मग मी पण "जय माता दी" ओरडले.. सगळ्याना तो वेगळा आवाज जाणवला असावा... सगळे हसले..."अरे हुई ना बात...!" मी पण एक्दम खुष झाले.. आणि तो चढ संपवुन टाकला... आम्ही आमच्या पहिल्या कॅम्पला पोचलो... मी लहान म्हणुन मला सर्वात पुढे ठेवलं... माझ्यानंतर साधारण २ तासांनी बाबा पोचले.. त्याना भेटल्यावर मला खुप आनंद झाला.. मी पहिली पोचले सांगितल्यावर, त्यांना विश्वासचं बसला नाही!

मग पुढे रोज मी त्यागी चच्चा बरोबर चालायला लागले.. त्यांच्याशी गप्पा मारत, त्यांच्या सगळ्यांच्या गप्पा ऐकत... मलाही "मी काय मोहिमा फत्ते करत्ये" अश्या मस्तीत चालत होते... ते लोक कायम मस्ती करत, हसत-खेळत चालले होते... इतकी आनंदी लोकं मी कधी पाहिलीचं नव्हती...ही लोक सैन्यात आहेत..
इतरवेळि हि लोकं बंदुका घेउन शत्रुला मारायचा सराव करत असतात किंवा प्रत्यक्षात युद्धात असतात? कसं शक्य आहे? सैनिक असेही असतात, आनंदात, मजा करत हे आत्तापर्यन्त कधी पहिलचं नव्हतं!
रोज मी नविन नवीन गोष्टी त्यांच्याकडुन ऐकत होते... खान्चाचा कसे युद्धाला घाबरतात.. म्हणुन बाकी सगळे त्यांना चिडवत होते....

आम्ही मस्त धमाल करत होतो.. हिमाचल प्रदेश मधल्या हिमालयात... आणि तोच हिमालय पुढे काश्मिरात गेला होता, जिथे काहीतरी होतयं ह्याची कुणकुण लागली होती! रोज रात्री गाणि म्हणत नाचणा-या फौजी ग्रुपला आपल्या येणा-या रात्री कश्या असणारेत ह्याची कल्पना नव्हती.. कधिच नसते.. म्हणुनच कदाचित ते इतर वेळि इतक्या आनंदात असतात!

ट्रेकचा शेवटचा दिवस उजाडला... आज मला पहिलं वगैरे पोचायचं नव्हतं, फक्त शेवटचा दिवस enjoy करायचा होता... मी त्यागी चच्चांबरोबर नाहि गेले, मागेच हळु हळु चालले होते.. एके ठिकाणि ते थांबलेले दिसले... त्यांचे डोळे पाणावलेले होते "बेटा, अब कलसे हम हमारी राहपर .. और तुम वापस तुम्हारी स्कुल, पढाईमे लग जाओगी... हमे भुलना नही बेटा! अरे तु तो मेरा बेटा है, ऐएसे मै क्यु केहेता हुं पता है? तुम्हारी उम्र का मेरा एक बेटा है, जो मेरे गावमे रेहेता है.. वोभी तुम्हारी तरह स्कुल जाता है! उसे यहापे नही लेके आ पाया, असे वक्तहि नही दे सकता.. तुम्हे देखके हमेशा उसकी याद आती है! इस्लिये कहता हु, तु तो बेटा है मेरा"

ट्रेक संपला, घरी आले.. कारगिलच्या बातम्या यायला लागल्या.. युद्ध सुरु झालं...मी रोज प्रार्थना करत होते..."कोणत्याही बाबांना काहीही नकॊ होऊ दे... ज्यांच्या घरी त्यांची मुलं वाट बघतात्य त्यांना सुरक्षित ठेव.. युद्ध लवकर संपव... सगळे लवकर परत घरी येउ देत"

त्यागी चच्चा च्या मुलाला मी कधी पहिलं नाहिये पण आजही मला ट्रेक आठवला की आठवतात त्यागी चच्चा आणि त्यांचा गावाला असलेला मुलगा!

Wednesday, March 5, 2008

दिपु!!

५ मार्च १९९२...

आई घराबाहेर निघाली तेन्ह्वा इतकंच कळत होतं कि आई हॉस्पिटलमधुन येताना बाळ घेउन येणार आहे!!आजोबांच्या कडेवर बसुन मी आईला ठणकवुन सान्गितलं होतं..."आणलंस तर मुलगी बाळ आण, नाहीतर नको आणु" आणि आईनी खरचं माझं ऐकलं,
हॉस्पिटल मधे आजीबरोबर जाउन मला आमचं नवीन बाळ बघायचं होतं...आईच्या जवळ झोपलेलं गोरपान, छोटसं बाळ... कित्ति कित्ति गोड होतं ते, इवलीशी हनुवटी, इवलेसे गाल, आणि नाक तर नव्हंतच आमच्या बाळाला... मी हळुच त्यस सोट्या सोट्या बाळाच्या गालांना हात लावला, किति मऊ-मऊ होतं शोन्या आमचं!!

शाळेत, बसमधे, घसरगुन्डीवर सगळि-सगळिकडे मी भेटेल त्याला सांगत सुटले होते "आमच्याकडे ना बाळ आणलयं आम्ही छोटसं" ...मग घरात शेकाचे,धुपाचे वास यायला लागले, बाल्कनीतल्या दोरीवर पांढ-या पताका लागायला लागल्या, रोज सकाळी रडारडीनंतर पावडर-तीट लावा चा कार्यक्रम होयला लागला.... बाळाचं बारसं झालं, बोर-न्हाण झालं, बाळ हळु हळु मोठं होयला लागलं...

तिला आई, बाबा म्हणता यायला लागलं... पण अजुन ती ताई म्हणतचं नव्हती... "शी बुआ, असं कय बाळ आणलं आईनी, ती आल्यापासुन आई-बाबा तिलाच जास्त प्रेम करतात, तिलाच जवळ घेतात,माझ्यावर कोणी प्रेम करतचं नाही" वगैरे वगैरे विचार मनात यायला लागले....
मग हळु हळु आमच्या गोन्डस पिल्लुचा गोरा रंगही मधे यायला लागला...ताइ काळी, पिल्लु गोरि...."पण जाऊदे मला नाक तरी आहे, बाळाचं नाक नकटं आहे"

ताई ओरडते,रागावते पण तरिही पिल्लु रोज मी शाळेतुन यायच्या वेळेला बाल्कनीतल्या ग्रिल्समधे डोकं घालुन बसायचं माझी वाट पाहत... ताई तिच्या मैत्रिणिंसोबत खेळायला जाते तेंवा पिल्लुला नेत नाही, तरीही ताईच्या मागे मागे फ़िरत पाना-फ़ुलान्चि भाजी-पोळी ताईला खायला द्यायची!!!

एकदा पिल्लुचा भोन्ड्ला केला, त्यानंतर दुस-या दिवशी ही बया बाल्कनीत बसुन ऐलोमा-पैलोमा गात होती, आईनी जाउन पहिलं तर तिथे हलवा सान्डला होता आणि मुन्ग्या आल्या होत्या,आईनी तिला एक सणसणीत धपाटा मारला...तरीही पिल्लु आईला हसत हसत सांगत होती.."आई, थांब नं, मुंग्यांचा भोन्डला चालु आहे" मुंग्या पडलेला हलवा नेताना गोल गोल फ़िरत चालल्या होत्या.. आणि आमची पिल्लु त्यांच्यासाठी..ऐलोमा-पैलोमा गात होती...

नंतर, पिल्लु मोठी कधी झाली आणि शाळेत कधी जायला लागली कळलचं नाही... युनिफ़ोर्म, दप्तर, गळ्यात छोटिशी वॉटरबॅग, २ छोटे-छोटे बो बान्धुन रोज स्वारि शाळेत जायला लागली...मधल्या सुट्टीत ताई आपल्या वर्गात येईल याची वाट पाहत बसलेली असायची...ताईही रोज नव्या मैत्रिणिला बरोबर घेऊन लहान बहिण दाखवायला जायची... मग सुरु झाल्या परिक्षा, मार्क्स, स्पर्धा, नंबर........."ताईचा कायम पहिला नंबर...मझा का नाही? ...ताईला जास्त प्रेम करता, मला नाही....ताईला स्कॉलरशिप,माझी काहिच मार्कानि तर गेली न..ताईच हुशार, मी नाही"असं नाहिये गं मनु.. तु पण हुशार आहेस... मनुनी पण दाखवुन दिलिच लगेच तिची हुशारी, आणि मग तिला पुण्याच्या प्रबोधिनित ऍडमिशन मिळाली...

पण मनु एक वर्ष एकटी राहणार आत्याकडे? अजुन साहवीतचं आहे..इतक्या लहान वयात? पण ती तयार झाली...सोनं आमचं कसं एकटं राहिलं वर्षभर...तिच्या डायरीत काऊंट-डाऊन असायचं आम्ही तिला भेटायला कधी जाणार ह्याचं, बाहेरुन आमची छोटिशी पोरगी फोन करायची, शाहाण्यासारखी वागताना, सहावितली मुलगी कधी माझ्या भावन्डांशि भांडलीही नाहि... किती शहाणी झाली किती कमि वयात!!

मनु, टीव्ही बघणं मात्र कमी करायला हवंय... "आत्याकडे टीव्ही नाहि बघायचे ना मी कधी...आता स्वतःच्या घरी तरी बघुदेत".... झालं ही पोरगी आता शहाणी झाल्ये पण वर्षभर न पुरवुन घेतलेले लाड आता नविन घरात आल्यावर पुरवुन घेणारे!! अन लाड पुरवुन घेतले मनुने...अजुनही घेत्ये!!

तिला काय कळतयं, लहान आहे अजुन म्हणुन कधी काही बोललेच नव्हते तिच्याशी मनापासुन...
त्यादिवशी डायरी वाचली मी तिची (चोरुन) त्यात चक्क तिने तिच्या "क्रश" विषयी लिहीलं होतं!
अगं ए ह्या लहान मनीला कोणी मुलगा वगैरे पण आवडायला लागला? इतकी मोठी कधी झाली ही?

माझ्या "त्याच्याविषयी"ही मी सर्वात आधी तिलाच गाठुन सांगितलं, माझी लहान बहिण एकदम माझ्या मोठ्या बहिणीसारखं माझ्याशी बोलायला लागली... "ताई, नीट विचार कर!" वगैरे वगैरे मोलाचे सल्ले दिले, अजुनही देते :)
"आता काय तुला "तो" आलाय, तुला आमची गरज काय आहे?
तुला आता माझी काही किम्मतच नाहीये" वगैरे वाद सुरु झाले. पण माझ्याशी भांडणारी मुलगी, मी त्याच्याशी भांडल्यावर लगेच.. आमचं भांडण मिटवायला पुढे!
मी तिला सॉलिड्ड त्रास देते आणि ती तो परतवुन लावते :)

स्मार्ट आहे ती, मला ब्लॅकमेल करणं आता जमायला लागलं आहे कि तिला आता...
कॉलेजातल्या मैत्रिणिंबरोबर फिरायला लागली आहे...
घरातल्या निर्णयांमधे स्वतःचं मत ऐकवायला लागल्ये!
आता खरचं मोठी झाल्ये!

ती आहे म्हणुनचं नाहीतर तिच्या भाषेत "ताईशी ’बहिणी’ करणं सोप्पं नाहीये" :)
मी खुपदा तिच्याकडुन मला हवी तशी कामं करुन घेतल्येत, तिच्यावर माझे मूड काढल्येत, भांड-भांड भांडल्ये, अनेकदा तिला हवा तेंव्हा वेळ दिला नाहीये! "वाईट्ट" बहिण म्हणुन असणारे सगळे गुण (अवगुण) माझ्यात आहेत!
आणि तरीही ती कायम ती तिच्या गोड आवाजात "ताई, काही हवं आहे का? काय झालयं? आपण एक गंमत करुया का" सारखे प्रश्न विचारत असते, मला आनंदात ठेवत असते!

आता आम्ही दोघीचं राहताना जिथे मी तिची काळजी घ्यायला हवी तिथे तिचं माझी आई झाल्ये!
सॉरी दिपीका, खुप त्रास देते ना मी तुला?खुप स्वार्थी आहे ना गं मी? खरचं इतकी वाईट्ट आहे मी? मी अशी असुन देवाने तुला माझी बहिण का गं बनवलं मग?कदाचित तुचं मला सांभाळुन घेउ शकतेस म्हणुन...

थॅन्क्स दिपु... माझी बहिण झाल्याबद्दल!