Saturday, March 23, 2013

आमच्या लग्नाची गोष्ट...

लग्न झालं आमचं... आणि मग लोकं हजार प्रश्न विचारायला लागले...का? कसं? कुठे? कधी? वगैरे वगैरे... म्हंटलं एकदा लिहून टाकूयात आपली गोष्ट...

तर ही गोष्ट सुरु होते इसवी सन १९८४मध्ये... अहमदनगरच्या एका वाघमारे कुटुंबात एक Hazel eyes चा मुलगा जन्माला आला...  लाडकं शेंडेफळ बनला... अतिशय हुशार वगैरे झाला .. पुढे जाऊन तो आपला हिरो होणारे.. तो २ वर्षाचा झाला तेव्हा रत्नागिरीच्या लेलेंना एक नात झाली... टपोर्या डोळ्यांची... अत्यंत सामान्य बुद्धीची वगैरे... पुढे जाऊन ती आपली हिरोईन आहे... 

गोष्ट तेव्हा सुरु झालेली असली तरी मुळात ही दोघं भेटली एकमेकांना इसवी सन २०१० मध्ये... भेटली म्हणजे वाचलं एकमेकांनी लिहिलेलं... आपली हिरोईन इथेच, ह्याच ब्लॉगवर लिहायची काहीबाही.. आणि हिरोही ब्लॉग लिहित होता मस्तपैकी... इथून तिथून कुठूनतरी ती त्याच्या ब्लॉगवर पोचली... तिने त्याचा ब्लॉग वाचला आणि तिला तो जाम आवडला... तिने कमेंट केली.. तिची कमेंट वाचून तो तिच्या ब्लॉगवर आला आणि मग त्याला ती आवडली... so ही त्यांची पहिली भेट... मग ते लिखाणातून, कमेंट्समधून भेटत गेले.. मग असंच एकदा त्याचं खरं नाव कळल्यावर तिने त्याला मेल केला आणि त्याने तिला रिप्लाय दिला.. मग ते बोलायला लागले मेल्समधून... chat करायला लागल्यावर माणसं उथळ बडबडायला लागतात हे दोघांनाही माहित होतं.. दोघंही बोलणं टाळत होते... मग ओळखी निघत गेल्या... "ओह ती तर माझी मैत्रीण आहे.." "अर्रे तो तर माझा मित्र आहे".. मग ह्या ओळखींमधून एकमेकांबद्दल अजून माहिती कळायला लागली...

मधेच एकदा त्याने विचारलं "भेटायचं का?" ती म्हणाली "अर्थातच... नाही"... सगळं छान सुरु असताना भेटून वगैरे आहे ते बिघडवायचं नव्हतं तीला... भेट पुढे जात राहिली, पण मधल्या वेळेत वेगवेगळ्या माध्यमातून संपर्क चालू होताच... त्याने तिला तार करून फोन नंबर कळवला.. तिने निळ्या पत्रावर प्राजक्त आणि जास्वंदीच्या गोष्टी त्याला लिहून पाठवल्या... त्याने तिला एकदा २२ रुपयांची मनीऑर्डर पाठवली... तिने त्याला तिचा आवाज CDवर रेकॉर्ड करून पाठवला... मग एकदा तो एक काम घेऊन आला तिच्याकडे , एका शोर्ट फिल्मच्या स्क्रिप्टसाठी मग ते रात्र रात्र जागून चर्चा करायला लागले... ती फिल्म काही बनली नाही पण आपली ही फिल्म तिथे अजून रंगत गेली...त्याला पुण्यात बसून तिच्या ठाण्याच्या घराजवळच्या कुत्र्यांचे आवाजही पाठ झाले..

१५ ऑगस्टला ती आली पुण्यात, तिच्या मित्राच्या साखरपुड्याला... आपटे रोडवरच्या एका हॉलमध्ये ती येणार म्हणून तो उगाचच त्या रस्त्यावर २-३ चकरा मारून गेला...अचानक तिला काय वाटलं म्हणून तिने सहज sms केला त्याला "भेटायचं का?" तो म्हणाला "अर्थातच.. हो"... आणि १५ मिनटात ते दोघं एकमेकांसमोर उभे होते आपटे सभागृहाच्या गेटवर... काय बोलायचं कळत नव्हतं दोघांना... पण awkward pauses  टाळायला  काहीही बडबडत होते दोघं.. तिने तर "झाडांवर करण्यात येणारं  lighting" या विषयावर ५ मिनटाचं भाषण वगैरे  दिलं होतं.. मग आधी बाईक आणि नंतर गाडीतून थोडावेळ गप्पा मारत, शांत बसत, उगाचच हसत फिरल्यावर तो मधेच थांबून म्हणाला तिला "मला असं आयुष्यभर गप्पा मारायला आवडेल तुझ्याशी" ती त्यावर फक्त हसली...

"च्यायला हाच मुलगा आवडायचा होता?? त्याचं आडनाव काही वेगळं नसू शकलं असतं का? " आठवडाभर खूप विचार केला तिने... सगळं इतकं perfect  दोघांमध्ये... मग जात कशाला मध्ये येते कडमडायला? पण त्याने विश्वास दिला तिला.. "सगळं होईल आपल्या मनासारखं".. मग त्याने तिला विचारलं आणि तिने "हो" म्हंटलं... आणि त्यानंतर आठवड्याभरातच तो गेला अमेरिकेत कामासाठी महिनाभर  ... दुष्ट कुठला.. पण ही सुरुवात होती फक्त, पुढे २ वर्षात अश्या हजार परीक्षा दिल्या दोघांनी मिळून वेगवेगळ्या... तिच्या घरचे नाही म्हणाले, त्याच्या घरचे नाही म्हणाले... "तो केसाने गळा कापेल तुझा".. "ती येऊन घर फोडेल आपलं" वगैरे वगैरे काहीही ऐकून घ्यावं लागलं त्या दोघांना स्वतःच्याच घरी स्वतःच्याच प्रेमाबद्दल... तरीही दोघं लढत राहिली.. समजावत राहिली... वेळ मिळेल तसा एकमेकांना भेटत राहिली... मुंबई-पुणे एक्सप्रेसवे त्याच्या सवयीचा बनला... तिच्या मित्र-मैत्रींणींना तो आवडायला लागला... तो भागच बनला तिच्या ग्रुपचा...

घरी सतत टेन्शन, बोलणी, राग ह्या सगळ्यातून एकमेकांसोबत मिळणारे एकुणेक क्षण celebrate  करत होती दोघं... अधूनमधून भांडतही होती दोघं.. भांडायला कारणं कुठे लागतात "साडी घालत नाहीत नेसतात", "भात खात नाहीत जेवतात" ही कारणंही कधी कधी तिसरं महायुद्ध घडवू शकतात... मग थोडावेळ अबोला धरल्यावर दोघं हसायला लागायची... "काहीही भांडतो ना आपण"... पण हे अबोले, ही भांडण अजून पक्कं करत होती त्यांच्यामध्ल नातं... घरच्यांच्या विनवण्या करून झाल्यावर ती मिळेल त्या देवाला नवस बोलत होती.. "जोडीने येऊ दर्शनाला पण आता लग्न होऊ दे आमचं"... कधी एकीकडचा विरोध मावळतोय अस्म वाटत असताना नवीन विरोध सुरु होत होता...

अशी २-अडीच वर्ष गेल्यावर दोघंही कंटाळली होती.. "पळून जाऊन वगैरे लग्न करायचं नाही" हा निश्चय विसरावा लागणार असं वाटत होतं... परत एकदा बोलणी सुरु केली.. तो तिच्याकडे गेला.. ती त्याच्याकडे गेली.. एकमेकांच्या आई-वडिलांना विश्वास देत होतो... त्याच्याकडे  give up केलं आई-वडिलांनी.. पण तिच्याकडे ऐकायला अजूनही तयार नव्हतेच... त्यात त्याला आता वर्षभरासाठी अमेरिकेत पाठवायची त्याच्या कंपनीची तयारी सुरु झाली होती... मग आता स्वतःच्या आयुष्याची सूत्र स्वतः हाती घेणं भागच होतं..

बाकी घरांमध्ये आधी कुटुंब भेटतात, मग बोलणी होतात, मग तारीख आणि कार्यालय ठरतं... पण इथे आधी तारीख ठरली , १८ फेब्रुवारी... "तुम्ही येऊन लग्न करून देणार असाल तर अत्युत्तम.. नाहीतर आम्ही लग्न करतोय त्यादिवशी" कार्यालय ठरलं... पत्रिका छापल्या... आणि मग अचानक चक्र फिरावी तसं दोन्ही घरचे सरसावले लग्नासाठी... लग्नाला २ आठवडे असताना लग्नाची तयारी सुरु झाली.. लग्नाआधी ३ दिवस दोन्ही कुटुंब भेटली आणि बोलणी झाली... दोघांची कपडे आणि दागिने खरेदी आदल्या दिवशी संपली rather संपवली ... आणि मग जवळच्या काही माणसांच्या साक्षीने "आमचं" लग्न  मस्तपैकी पार पडलं... २ वर्षांपूर्वी पाहिलेलं स्वप्न प्रत्यक्ष उतरलं.. आयुष्यभर गप्पा मारणारोत आम्ही.. :)

आणि आता "touchwood" सगळं सुरळीत चालू आहे.. नवर्यासोबत अमेरिकेत आल्ये... आई-बाबा, सासू-सासर्यांसोबत रोज स्काईपवर गप्पा होतायत... आता नवीन स्वप्नं बघतोय आम्ही दोघं मिळून...

आता ही गोष्ट कुठे खरी खरी सुरु होत्ये... 

"Happily Ever after starts here..." :)