Tuesday, September 9, 2014

Praising the Bridge that carried us...

"तुझा सर्वात आवडता पूल कोणता?"  मी अमोलला विचारलं...
त्याने खूप जास्त विचार केला.. "पूल म्हणजे ब्रिज न ?" असं म्हणून पुन्हा विचार करायला लागला.
माझ्याकडे तेवढा patience नसतो... मीच मग म्हणाले "Golden Gate न? ok..."
मग परत त्याच्याकडे बघत बसले... आता माझाच नवरा आहे तरीही मी इथे नमूद करू इच्छिते कि Ray-Ban मध्ये तो छावा दिसतो!
तो गाडी चालवत होता, साधारण १ दीड मैल पुढे गेल्यावर त्याच्या लक्षात आलं कि मी शांत आहे.. आणि मग मी का शांत असेन ह्याचं कारणही त्याने ओळखलं..
"ओह.. मी तुला विचारू का?.. ओके सांग.. तुझा सर्वात आवडता पूल कोणता आहे?"

"एक असा नाही... ४-५ आहेत.. सांगू?"
साधारण आमच्या सगळ्या गप्पा थोड्याफार फरकाने  अश्याच सुरु होतात... नशिबाने त्याला ऐकायला आवडतं आणि मला बोलायला...

"आवडते सांगते, पण नावडता ब्रिज शाळेसमोरचा... एकदम लहानसा पत्र्याचा पूल होता फक्त लोकांना चालण्यासाठी , खाडीवर बांधलेली कॉलनी होती आमची. ब्रिजच्या दोन्ही बाजूला घनदाट Mangroves, खाली प्रचंड चिखल... लहान असताना मला कायम कधीही एखाद्या झाडामागून मगर किंवा डायनासोर येईल असं वाटायचं... मी कायम मनातल्या मनात प्रार्थना करत असायचे तो पूल ओलांडताना... कोणताही प्राणी नको येऊ दे इथे..
म्हणजे हे सेल्फिश आहे पण लहान असताना अनेक पूल ओलांडताना मी मनातल्या मनात म्हणत असायचे 'देवा प्लीज हा पूल पाडू नकोस... तुला पाडायचाच असेल अगदी , तर माझा ओलांडून झाल्यावर पाड'... पण हा ब्रिज कधीच पाडू नकोस अशी प्रार्थना करते मी "

आम्ही तोवर गोल्डन गेटवर पोचलो होतो. एस-एफ पासून आम्ही तसे तासाभारावर राहतो पण महिन्यातून कमीतकमी एकदातरी तिथे जायलाच हवं असा अलिखित (आता लिहिला गेलेला ) नियम आहे आमच्याकडे! आणि बे एरियात येणाऱ्या आमच्या मित्र/नातेवाईकांना गोल्डन गेटवर नेणं हे आम्ही आमचं कर्तव्य समजत असल्याने अधूनमधून जाणं होतंच तिथे...
आतातर मी आपल्याकडे गाईड कसे facts and figuresचा भडिमार करतात कुठे गेल्यावर, तसंही करायला शिकल्ये. " ब्रिजला सतत रंग द्यायला लागतो, आणी ब्रिज इतका मोठा आहे कि एका टोकावरून रंग देत दुसऱ्या टोकाला पोचेपर्यंत परत पहिल्या टोकाला रंग द्यायची वेळ येते" अश्या अनेक खऱ्या खोट्या गोष्टी मी लोकांना सांगत राहते.

"अश्या खऱ्या खोट्या गोष्टी मला कोणी न कोणी चरवेलीच्या साकवाबद्दल सांगायचं... पावसात पर्ह्यात  पाणी भरून वाहायचं... तेव्हा फांद्यांपासून बनवलेल्या त्या कामचलाऊ पुलावरून जायला मला प्रचंड भीती वाटत असायची... पुलाच्या ह्या बाजूला आमचं घर आणि शेत, त्याबाजूला विठ्ठलाचं देऊळ आणि गराठवाडी... मला अनेक पुलांब्द्द्ल हे आवडतं... पुलांच्या दोन बाजूंना किती वेगळ्या दोन जागा असतात, वेगळी दोन जगं असतात  .. साकव लेल्यांच्या चार  ब्राह्मणी घरांना वीस एक गराटे  घरांशी जोडतो.. आमचा कॉलनीतला पूल ऑफिसर्सच्या घरांना कामगारांच्या घरांशी जोडत होता... गोल्डन गेट एस-एफच्या झगमगाटाला, जोषाला सौसलीटोच्या शांत आरामाला जोडतो... " मी अमोलला सांगतच होते... काही काहीवेळा अतिसामान्य बोलतानाही मी जाम फिलोसोफिक्ल काहीतरी बोलत्ये असा आव आणते. आवडतं मला तसं!

आम्ही तिथल्या एका फोनला क्रॉस झालो, मी कायम कोणी तिथे बोलत नाहीये न फोनवर ते बघते... गोल्डन गेट आत्महत्या वगैरे बाबतीतही फेमस आहे. पुलावर काही ठिकाणी suicide helplines म्हणून फोन आहेत... (अर्थातच, ते परावृत्त करतात, आत्महत्या करायला मदत नाही करत) ...
"असायला हवेत असे फोन आत्महत्या इच्छुकांच्या आवडत्या जागांवर... लोकलनी उल्हासनगरला जाताना अनेकदा मला ती बाईची गोष्ट आठवायची... माहित्ये न? कोणीतरी बाईनी लोकलमधून खाडीत उडी मारून जीव दिला होता म्हणे आणि आता कोणत्याश्या पौर्णिमेला वग्गैरे असते ती ट्रेनमध्ये.. अगदी नॉर्मल बाईसारखी असते असं काहीतरी... "

अमोलनी  माझ्याकडे न बघता मला विचारलं "तुला दिसली होती?"

"माहित नाही.. दिसली असेलही.. कळणार कसं?"

"हं... बरं.. मला एक आठवला .."
कधी कधी होतं हे, कदाचित मी जास्त बोर करायला लागल्यावर मग तो बोलायला लागतो किंवा काहीवेळा त्याला खरंच सांगायचं असतं म्हणून...
" नगरचा मिस्कीन मळ्याच्याइथला... पूल म्हणजे लहानसाच होता, पावसाळ्यात पाणी वाहायचं फक्त पुलाखालून... आणि पुलाखालून बरंच पाणी वाहून गेलं तिथे बरं का.. (I know, he is very good at it) आम्ही सायकलनी जायचो तेव्हा, त्या पुलावरून न जाता मुद्दाम एका दुसऱ्या रस्त्याने जायचो... म्हणजे ओढ्यातून जायला मिळायचं पाण्यातून"
आता इथे clearly मी बोर करत होते म्हणून तो बोलला.. म्हणजे तो त्या पुलावरून जायचाही नाही आणि तरीही उगाच!

आमचा पूल एव्हाना ओलांडून झाला होता... "टोल नाक्यावरून... मला खारपाड्याचा पूल आठवला आणि त्याच्या दोन्ही बाजूंचा अडकून पडलेला ट्रफिक.. आता नवीन पूल झाल्यावर खूप चांगलं झालं आहे नाहीतर आधी अलिबागहून मुंबईला जाताना अर्धा-एक तास आरामात जायचा खारपाड्याला... वाशीच्या पुलावरही जायचा कधी कधी असा वेळ... पण तो पूल आवडतो मला... नवी मुंबईत राहायचे तेव्हा वाशीचा पूल ओलांडल्यावरच "आता घर आलं" अशी फिलिंग यायची.. मस्त वाटायचं "

मागे वळून मी गोल्डन गेटकडे बघत होते.." छान दिसतो न किती गोल्डन गेट... मी अजून बांद्रा-वरली सीलिंकवरून गेले नाहीये पण मला तो दिसायला आवडतो... बिक्स्बी आवडला होता मला... पुण्याला राजाराम आवडायचा कारण तिथपासून टमटम मिळायची कॉलेजपर्यंत... झेड ब्रिज वगैरे ठीकच.. आजी-अप्पांकडे जाताना खडताळ पूल लागायचा तो आवडायचा... आणि आणि... दोन मनांना जोडणारा, काहीतरी म्हणतात नं smile is the smallest bridge between two hearts.. असंच आहे न? " मी आठवत होते..

"दोन कडव्यान्मधल्या म्युझिकला ब्रिज म्हणतात न?" अमोलनी मला विचारलं... ह्याचा अर्थ "आता विषय बदल" असा होऊ शकतो!
"तुला पत्त्यांमधला ब्रिज येतो खेळता? तुझा पत्त्यांमधला सर्वात आवडता खेळ कोणता? "  त्याच्याकडे बघून हसत मी विषय बदलला...
पूल, पत्ते, फिलोसोफी, नोस्ताल्जीया विषय कोणताही असो... जोवर हे गप्पांचे पूल आम्हांला जोडून ठेवतायत तोवर मी बडबड करत राहणारे!

4 comments:

Dhanashree said...

Asech badbadat raha ! :)

sagar said...

छान लिहिलं आहेस खुप. तुझ्या बडबडीमुळे पुलांच्या गप्पा, गप्पांचे पूल, पुलांचे रस्ते आणि रस्त्यांच्या अजून भरपूर गप्पा मस्त रंगतात…

Unknown said...

मला तर मनं जोडणारा पूल आवडतो :)

Sneha said...

majhyashi kittidiwas jhale badbad keli nahiyes :(